अखेर नवीन पोलीस आयुक्तालयाचे ग्रहण सुटले चिंचवडच्या प्रेमलोक पार्क मध्ये जागा मंजुरी
पिंपरी-चिंचवड शहरासाठी होणारे स्वतंत्र नवीन पोलीस आयुक्तालय चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्येच होणार असून पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याच्या महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली,
मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली होती. यासाठी एकूण 4840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणकडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत. पोलीस आयुक्तालया बाबतचा अध्यादेश देखील नुकताच पारित करण्यात आला आहे. तसेच पोलीस आयुक्तलायासाठी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालय सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही वेगात सुरु आहे. एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी प्रशस्त जागेची आवश्यकता आहे.
पोलीस आयुक्तलायाची घोषणा झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून शहरातील विविध जागांचा शोध घेणे सुरु केले होते. याकरिता संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील तंत्र शिक्षण संस्थेजवळील मोकळी जागा, 'फ' क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डी प्राधिकरणातील हेडगेवार भवन आणि चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेची जागा आयुक्तालयासाठी योग्य असल्याचे, पालिकेला 8 मे 2018 रोजी कळविले होते.
त्यानंतर चिंचवड, प्रेमलोक येथील महात्मा फुले शाळेची इमारत आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. या शाळेची इमारत प्रशस्त आहे. ग्राऊंड फ्लोअर, दोन मजले, भुखंडाचे क्षेत्रफळ एकूण 4427.50 चौरस मीटर आहे. तळमजला 761.84 चौरस मीटर आहे. पहिला मजला 731.29 तर दुसरा मजला 712.00 चौरस मीटर आहे. शाळेसमोरील मोकळ्या मैदानाचे क्षेत्रफळ 3665.16 चौरस मीटर आहे. प्रत्येक मजल्यावर सात वर्ग खोल्या आणि एक सभागृह आहे. ही जागा पोलीस आयुक्तालयासाठी देण्यास महासभेने मान्यता दिली आहे.