शिवाजी महाराजांचे आश्वासनपत्र सापडले

भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी लिपीचे अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजांचे पत्र सापडले आहे. हे पत्र म्हणजे महाराजांच्या मूळ पत्राची समकालीन अशी हुबेहूब प्रत (नक्कल) असून, ती 'कौलनामा' म्हणजेच 'आश्वासनपत्र' या पत्रप्रकारात मोडते. हे पत्र इसवीसन १६५७-५८ च्या काळात म्हणजेच महाराजांच्या राज्यभिषेकापूर्वी लिहिलेले आहे. पत्राची सुरुवात, 'कौलनामा अजरख्तखाने राजेश्री सिवाजी राजे दामदौलतहू...' अशा फारसी मायन्याने केलेली आहे.

हे पत्र पुणे परगण्यातील जेजुरीच्या सूर्याजी पाटील माळवदकर याला लिहिलेले आहे. जेजुरीचा पाटील सूर्याजी माळवदकर हा दौंडज गावाच्या मालजी पाटील माळवदकर यास जामीन राहिला होता. परंतु मालजी पाटील फरारी झाल्यामुळे त्याने सरकारात भरावयाची रक्कम सूर्याजी पाटलास स्वतःचे पाटीलकीचे वतन विकून भरावी लागली. यानंतर आपले उपजीविकेचे साधनच गेल्यामुळे तो महाराजांपाशी मदतीच्या याचनेने आला. महाराजांनी त्याला या अडचणीतून बाहेर येण्यासाठी कर्ज उपलब्ध करवून दिले.

Review