असे असेल क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय
असे असेल क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय
क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात त्यांचे भव्य सहा मजली स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या दुस-या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन येत्या सोमवारी (दि.23) सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, बाबू नायर, माउली थोरात, प्रदेश नेत्या उमा खापरे, महिला अध्यक्षा शैला मोळक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.
असे असणार आहे संग्रहालाय!
पहिला मजला - या मजल्यावर भारताच्या 2500 हजार वर्षाच्या काळातील ठळक 30 ते 35 दगडी शिल्पे असणार आहेत. त्याची साईज 8 बाय 6 साकारण्यात येणार आहे. त्यामध्ये भगवान तथागत गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांनी जो संदेश समतेचा दिला आहे. यावर आधारित 3 शिल्पे असतील. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे शिल्प असेल स्मारकाच्यामधोमध 4 शिल्पांमध्ये शिवचरित्र साकारले असेल. उर्वरित भागात थोरले बाजीराव पेशवे, उमाजी नाईक, 1857 स्वातंत्र्यसमर, लहुजी आणि वासुदेव बळवंत फडके ते सुभाषचंद्र बोस यांचे महानिर्वाणापर्यंत प्रसंग शिल्पांकीत करण्यात येतील.
दूसरा मजला - पूर्ण भारत भरातील सर्व क्रांतिकारकांचे सचित्र इतिहास संकलित केला जाईल. त्यामध्ये वनवासी क्रांतिकारक, भटके विमुक्तातील क्रांतिकारक, महिला क्रांतिकारक, अशी क्रांतिकारकांची राज्यवार दालने असतील. याच भागात एका दालनात भारतातील संतांचे कार्य सचित्रपणे दाखविण्यात येईल. तसेच गेली 2500 वर्षातील शस्त्रांचा संग्रह या ठिकाणी असेल.
तिसरा मजला - यामध्ये प्रबोधन पर्वाचा इतिहास सचित्र दाखविण्यात येईल यात राजाराम मोहन राय यांच्यापासून महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी नायडर या सर्व प्रबोधन चळवळींचा इतिहास, त्या बरोबर स्वामी परमहंस ,विवेकानंद, योगी अरविंद, पू. डॉ. हेडगेवार इ. यांच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते महात्मा गांधी सरदार वल्लभ भाई पटेल या सर्व चळवळींचा चरित्र इतिहास ठेवण्यात येईल.
चौथा मजला - या सर्व विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समाज विज्ञान संशोधन विकास संस्था यांच्या मार्फत संपूर्ण देशभरातील क्रांतिकारकांची जन्मठिकाणे, स्मृतिस्थळे, गड, किल्ले या ऐतिहासिक ठिकाणचे संकलन, इतिहास या ठिकाणी असे उपक्रम करण्यासंबंधी निवासी कार्यकर्त्यांचे अभ्यास केंद्र, ऐतिहासिक ग्रंथालय, कार्यालय असणार आहे.
पाचव्या मजल्यावर 350 जागांचे सभागृह असेल.
सहावा मजला - हा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अन्य उपक्रम, रेकॉर्ड, रेकॉर्डिंग रूम, बैठक, कार्यालय यासाठी असेल. हे संपूर्ण होत असताना मूळ चापेकरांच्या वास्तूमध्ये क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या कार्याचा सचित्र, मूर्तीरूपाणे, वस्तू रूपाने प्रसंग उभारण्यात येथील. सध्या या ठिकाणी त्यांचे देव, तलवार व घरातील वस्तू आहेत.
या राष्ट्रीय संग्रहालयात भारतातील विविध कला, शिल्प, वस्तु, संगीत, कुटुंब व्यवस्था या सगळ्याचे एकत्रित दर्शन ही घडेल. यातून येणारा दर्शक वस्तूचे दर्शन घेतल्यानंतर प्राचीन भारत कसा होता याचा ठसा मनावर प्रकटेल जो या ठिकाणी येईल तो सक्रिय सहभाग भारताच्या पुनर्निर्माणासाठी करेल.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे म्हणाले, क्रांतिकारकांचे स्मारक तोला-मोलाचे व्हावे. दोन टप्प्यात स्मारकाचे काम होणार आहे. स्मारकाच्या माध्यमातून क्रांतिकारकांचा इतिहास पहिल्यांदाच नव्या पिढीसमोर येणार आहे.