चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी चिंचवड दौऱ्याच्या दरम्यान चिंचवड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी निदर्शने केली. मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी हे निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
मराठा आरक्षणाची मागणी मान्य न केल्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवित त्यांचा सोमवारचा दौरा होऊ देणार नसल्याचे पत्रक पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाने आज काढले होते. मुख्यमंत्र्यांची सभा व भुमिपूजनाचा कार्यक्रम उधळण्याचा बेत आखण्यात आला होता. त्याप्रमाणे चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटलसमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला. या मोर्चानंतर मराठा समाजातील २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्यावीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवडमधील होणारी सभा उधळून लावणार असल्याचे वृत्त दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज चिंचवडमध्ये निदर्शने करण्यात आली.
काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या – मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीती अंमलबजावणी न करणा-या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रुपांतरण करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी बॅंकाना सक्तीचे आदेश द्यावेत.