शिवचरित्राचा दिपस्तंभ - बाबासाहेब पुरंदरे
महाराष्ट्राला सर्वात मोठे लेणे लाभले ते प्रतिभावंतांचे .. महाराष्ट्राने सार्थ अभिमान धरावाअसा प्रतिभेचा पराक्रम, कलेचा आणि विद्येच्या क्षेत्रात क्षेत्रात अनेकांनी गाजवला त्यापैकी एक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,
आपल्या ओघवत्या वाणीतुन संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर जगाला त्यांनी शिवचरित्र सांगितलं व त्यांचे हे कार्य आजही अखंडपणे चालू आहे. बाबासाहेबांकडून शिवचरित्र म्हणजे एक अनोखी पर्वणीच.
बाबासाहेबांची प्रसंगांची मांडणी व तासन्तास त्यांच्या मुखातून शब्द शब्दांचा वेग अत्यंत वेगाने खळखळत असतो. त्यामुळेच शिवचरित्र ऐकणाऱ्यासही शिवशाही अवतरल्याचा भास होतो.
त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी, पुण्यात शुक्रवार पेठेत झाला. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण भावे स्कूलमध्ये झाले, 1933 मध्ये त्यांचे कुटुंब डोणजे येथे सिंहगड पायथ्याशी दोन महिन्यासाठी वास्तव्याला गेले यामुळे बाबासाहेबांनी सिंहगड पाहिला आणि याच काळात बाबासाहेबांना गड किल्ले पाहण्याची आवड निर्माण झाली.
1951साली बाबासाहेबांनी शिवचरित्र लेखनास प्रारंभ केला. त्या दरम्यान अनेक सुखद तर काही दुखद घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. तरीही प्रसंगांना सामोरे जात बाबासाहेबांचा शिवमय प्रवास हा सुरूच राहिला. याच काळात बाबासाहेबांनी गडकिल्ले फिरणे भारत इतिहास संशोधक मंडळात संशोधन करणे व शिवचरित्राचे लेखन हे सर्व कार्य सुरू केले. आणि 1958 पहिले शिवचरित्र प्रकाशित झाले. हा सर्व प्रपंच करण्याचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्राचा जाणता राजा कसा होता, किती महान होता, हे जनमानसात कळावं, समजावं आणि त्याला जोड लिखाणाची, व्याख्यानाची आणि जाणता राजा सारख्या महानाट्याची. या सर्व माध्यमातून शिवचरित्र जनमानसात पुढे मांडले गेले. अशाप्रकारे अविरतपणे शिवकार्य करुन तरूणांनाही लाजवेल अशीच त्यांनी वाटचाल केली.
, इतिहासाविषयी अभिमान, चिकाटी, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह,शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे.
(हा लेख साईप्रसाद कुंभकर्ण यांचा असून ते लेखक, व्याख्याते आणि पत्रकार आहेत)