चोरीचा मामला, तोच जखमी, तोच फिर्यादी, तोच पीडित आणि तोच आरोपी...

तो दीड कोटींचे दागिने घेऊन पुण्याला येतो, येताना स्टेशनवर त्याला चोरटे घेरतात, त्याच्यावर हल्ला करतात, त्यावर चाकूने वार करून, त्याला जखमी करून, दागिने घेऊन पोबारा करतात. बातमी वाऱ्यासारखी पसरते, पोलीस येतात, चौकशी सुरु होते.
थोडा सस्पेन्स, थोडा थ्रिलर, घात-आघात, विश्वासघात, नाटक, अभिनय, आणि शोध...
एखाद्या चित्रपटाला शोभावा असा हा घटनाक्रम,
घडला आहे पुणे स्टेशनवर...

मुंबईतील जव्हेरी बाजार येथील रांका ज्वेलर्स या सराफी पेढीत 'अजय होगाडे' हा शिपाई म्हणून कामाला होता.गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास चार मोठय़ा पाकिटात दागिने घेऊन अजय दादरहून रेल्वेने पुण्याकडे यायला निघाला. पिशवीत सोन्याचे मंगळसूत्र, पाचूच्या माळा, हिरेजडित दागिने, कर्णफुले असा ऐवज होता. एका पिशवीत ही सर्व पाकिटे ठेवण्यात आली होती.मध्यरात्री सव्वाच्या सुमारास अजय पुणे रेल्वे स्थानकाच्या फ्लॅट क्रमांक 6 च्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना अजयच्या मागावर असलेल्या चोरटय़ाने त्याच्याकडील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. अजयने त्यांना प्रतिकार केला. तेव्हा चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी अजयला मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. पिशवी हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
अजय ने तात्काळ मालकाला कळवले, पोलीस आले आणि सुरु झाली शोध मोहीम...
आणि उघड झाले धक्कादायक सत्य...
फिर्यादी आणि पीडितच ठरला खरा गुन्हेगार
पोलिसांना फिर्यादी अजय होगाडे याच्याविषयी संशय आल्याने त्यांनी त्याला विचारपूस केली असता हा गुन्हा त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले.
होगाडे याने बाप, भाऊ यांच्या मदतीने हा गुन्हा करून रायगड येथील टकमक टोकाच्या खाली डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीत चोरी केलेला मुद्देमाल लपवून ठेवला होता.
होगाडे कुटुंबावर व्याजासहित 12 लाख रुपयांचे कर्ज होते. हे फेडण्यासाठीच फिर्यादीने हा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने स्वतःच्या अंगावर जखमा केल्या आणि साथीदारांच्या हस्ते मुद्देमाल मुंबई येथे पाठवला. चोरटे मुंबईतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक आयुक्त समीर शेख, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव आणि पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले. तेथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेला एक साथीदार फरार झाला. चोरट्यांकडून सव्वाकोटी रूपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अजय होगाडे (वय 21 रा सायन मुंबई) , अन्नू कुमार आणि मारुती बाबू होगाडे या आरोपीना पोलिसानी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे.
गुंतागुंतीची हि केस पोलिसानी अत्यंत कमी वेळात सोडवली, आणि खऱ्या गुन्हेगारांना गजाआड केले.

Review