घर फिरले कि घराचे वासे सुद्धा फिरतात - डी. एस. कुलकर्णी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून गायब...

पुणे ( सह्याद्री बुलेटिन ) - घर फिरले कि घराचे वासे सुद्धा फिरतात अशीच गत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची झाली असून यांच्यावरील धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमातून वगळले आहेत. वाणिज्य शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (बी. कॉम) पहिल्या वर्षाला मराठी विषयासाठी यशोगाथा पुस्तकात व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर लिखित धडा चालू शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमातून वगळला आहे. त्याचबरोबरच बी. कॉमच्या तृतीय वर्षाला "बिझनेस आंत्रप्रिनिअरशिप स्पेशल पेपर 3'मधील "द स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफी ऑफ फॉलोइंग आंत्रप्रिनिअरर्स'मधील कुलकर्णी यांच्यावर आधारित भाग वगळला आहे. कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर अभ्यासक्रमातील संबंधित धडा वगळावा, असे पत्र डॉ. शेजवलकर यांनी विद्यापीठाला दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.
डी. एस. कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून वगळावा, अशी मागणी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक, संघटनांनी केली होती. त्यानुसार सर्व कायदेशीर बाजू तपासून हे धडे वगळले आहेत. त्यासंदर्भातील परिपत्रकही विद्यापीठाने काढले आहे.
- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Review