ढाळगाव येथे बेकायदेशीर स्फोटक साठा जप्त...
रायगड (सह्याद्री बुलेटिन ) - ढाळगाव(ता - माणगाव) येथे एका घरात पोलिसांनी छापा टाकून 945 डिटोनेटर्स आणि 46 जिलेटीन कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी नूर महमद हुमर जाहीर काझी याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर स्फोटके ब्लास्टिंग ड्रिलसाठी वापरण्यात येणार होती असे समजते. मात्र, बेकायदेशीर रित्या स्फोटके साठा करून ती बाळगल्याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. त्याचा अन्य कुठे वापर केला जाणार होता याची माहीती घेतली जात आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी माणगांव ढालघर फाट्याजवळील स्फोटकांच्या साठ्याबाबत अधिक माहिती सांगितले की, चार-पाच दिवसापूर्वी माणगाव तालुक्यातील एक आदिवासी मच्छिमार स्फोटक पदार्थ हाताळताना झालेल्या एक आदिवासी जखमी झाला होता.
पाण्यात मच्छिमारी करताना आदिवासी मच्छिमार जखमी कसा झाला, याची चौकशी करीत असताना पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. हे आदिवासी मच्छिमार मासेमारीसाठी जाताना या प्रकारची स्फोटके सोबत घेऊन जात असत. ही स्फोटके त्याच्या प्रवाहात विशिष्ट जागी ठेवली असता त्यांचा स्फोट होऊन आवाजाने मेलेले मासे एका जागी गोळा होत मच्छीमारांना ते जमा करता येत असत. मात्र, असे करीत असतानाच हा आदिवासी मच्छिमार जखमी झाला होता. आदिवासी मच्छीमारांकडे हीच स्फोटके कुठून आली, याचा शोध घेताना पोलिसांना नूर मोहम्मद यांचे नाव समजून आले. हा नूर मोहम्मद आदिवासी मच्छीमारांना स्फोटके विकत असल्याची माहिती मिळाली. यामुळे माणगाव पोलिसांनी त्याच्या भाड्याने घेतलेल्या घरावर धाड चालली असता जिलेटिन डिटोनेटर तसेच अन्य विस्फोटक पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. नूर मोहम्मद याच्याकडे ही विस्फोटक विकण्याचा आणि खरेदी करण्याचे कोणताही परवाना नव्हता, असेही चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आले आहे. नूर मोहम्मद याच्याकडे केलेल्या चौकशीनुसार जिलेटिन आणि डिटोनेटर तसेच स्फोटकासाठी लागणारे सामान एका अधिकृत विक्रेत्याकडून घेत असल्याचे समजले. पोलीस आता या अधिकृत विक्रेत्याची कसून चौकशी करीत आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.