राष्ट्रवादीने मराठ्यांसाठी काहीच केले नाही - नरेंद्र पाटील
मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - ‘राष्ट्रवादीने मराठा समाजासाठी काही तरी केले असते तर आपल्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली नसती’, असा आरोप माथाडी कामगारांचे नेते, राष्ट्रवादीचे माजी विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील यांनी करून राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. राष्ट्रवादीशी संबंधित महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचाही पाटील यांनी राजीनामा दिला आहे. नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २७ जुलैलाच संपली हाेती. त्यानंतरही फडणवीस सरकारने नुकतीच त्यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली. तेव्हाच पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले हाेते.
‘माथाडी कामगारांची संघटना माझ्या वडिलांनी स्थापन केली. माथाडी कामगारांमध्येही मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांच्या नावाने मराठा समाजाच्या हितासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन केले होते. मात्र त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात हे महामंडळ मृतवत झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामंडळाचे पुनरूज्जीवन करण्याची घोषणा करत दोनशे कोटींचा निधी दिला. आता या महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याला देण्यात आले आहे. राष्ट्रवादीत राहून हे पद भूषविणे आपल्याला योग्य वाटत नाही,’ असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच अापण अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण मराठा समाज आणि माथाडी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.