राम कदम यांच्या प्रतिमेस पिंपरीत जोडे मारले

 
पिंपरी (दि. 05 सप्टेंबर 2018) (सह्याद्री बुलेटीन) - भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या निंदाजनक वक्तव्याविरोधात पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली काळभोर आणि पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात तीव्र निदर्शने करीत राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध केला. 
 
       वैशाली काळभोर व गिरीजा कुदळे निषेध व्यक्त करताना म्हणाल्या की, भाजप नेत्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. त्यामुळे ते आता  हुकूमशाही, दडपशाही बरोबरच महिलांना देखील अपमानास्पद वागणूक देत आहेत. महिलांचा सन्मान राखणाऱ्या भारत देशाच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम भाजप नेत्यांकडून सातत्याने होत आहे. महिलांचा अनादर करणारे निंदनीय वक्तव्य भाजप आमदार, प्रवक्ते राम कदम यांनी मुंबईत दहीहंडीच्या कार्यक्रमात केले. 'मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणुन लग्न लावून देण्यास मदत करणार' असे ते म्हणाले. यातून त्यांची संस्कृती दिसून येते. बेटी बचाओ, बेटी पढाओ असा भाजपचा नारा सोडून कदम "बेटी भगाव" हा नवीन नारा त्यांच्या कार्यकर्त्यांना देत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये मुलीं व महिलांविषयी हिंसक भावना वाढीस लागेल. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. राम कदम यांनी महिलांची जाहीर माफी मागावी. अन्यथा राज्यभर कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारुन आंदोलन तीव्र करु असा इशारा काळभोर व कुदळे यांनी दिला. 
 
           यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अरुण बो-हाडे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, उषा वाघेरे, माई काटे, शितल काटे, सुलक्षणा धर, विनया तापकीर, निकिता कदम, स्वाती साने, गिता मंचरकर, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख तसेच पुष्पा शेळके, शामलाताई सोनवणे, बिंदू तिवारी, मनिषा गटकळ, कविता खराडे, अरुणा कुंभार, विश्रांती पाडाळे, विनीता तिवारी, वैशाली कुदळे, वंदना कुदळे, प्रकाश सुर्यवंशी, विनोद कांबळे, बाळासाहेब पिल्लेवार, सिंधुताई पांढरकर, सायराबानू शेख, शितल कोतवाल, आनंदा यादव, इम्रान शेख, अशोक कुंभार, सहजादी सैय्यद आदींसह कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. 

Review