पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच भाजप सरकारचे एकमेव धोरण - माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा जनसंघर्ष यात्रेत एल्गार...
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) - लोकसभा, विधानसभा निवडणुकी वेळी दिलेले एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच एकमेव धोरण केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे आहे. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या असून प्रश्न सोडविण्यास सत्ताधा-यांना वेळ नाही. सत्ताधारी मस्तवाल झाले आहेत. त्यामुळे मस्तवाल झालेल्या भाजपला सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केले. तसेच पिंपरी-चिंचवड शहराकडे आजपर्यंत दुर्लक्ष केल्याची कबुली देत यापुढे लक्ष्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, आमदार भारत भालके, संग्राम थोपटे, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवरकर, प्रवक्ते रत्नाकर महाजन, शहराध्यक्ष सचिन साठे, गिरीजा कुदळे, श्यामला सोनवणे, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, मयुर जयस्वाल आदी उपस्थित होते.