मुले बिघडण्या ऐवजी मास्तरच बिघडू लागले,,,,,, गाढवालाही लाज वाटेल असे झगडू लागले...
सांगली (सह्याद्री बुलेटिन ) - आजपर्यंत मास्तरांनी विद्यार्थ्यांना मारल्याचे विदित होते, पण आधुनिक मास्तरांनी मात्र नवा पायंडा पडला आहे, आता ते एकमेकांना मारण्याचे पुण्यकर्म करण्याचे अध्यापन करत आहेत, अक्षरशः लाथा बुक्क्या आणि मुखात शिव्यांची बाराखडी अशा अविर्भावात या मास्तरांनी एकमेकांना ठोकून काढले. हा सर्व तमाशा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 66 व्या सर्वसाधारण सभेत दीनानाथ नाट्यगृहात घडला,
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षकबँकेच्या सर्वसाधारण सभेत रविवारी सत्ताधारी व विरोधकांत हाणामारी झाली. सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावर खाली पाडून मारहाण करण्यात आली. तर मारहाण करणाऱ्या गुरुजीला सत्ताधाऱ्यांनी प्रसाद दिला.
बँकेचे व्यवस्थापक बाळासाहेब कोले यांनी अहवाल वाचनाला सुरुवात केली. विरोधी संचालक विनायक शिंदे यांनी व्यासपीठसमोर येत अजेंड्यावरील जागा व इमारत खरेदीचा विषय क्रमांक 9 रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. शिंदे समोर येताच सत्ताधारी गटाचे संचालकही त्यांच्या दिशेने धावले. याचवेळी खालून एक सभासद व्यासपीठावर धावून आला. तो संचालक बजबळे यांच्या अंगावर धावून गेला. दोघांत झटापट झाली. यात दोघेही खाली पडले. दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. तोपर्यंत इतर संचालकही मदतीला धावले. त्यांनी बजबळे यांना बाजूला काढून त्या शिक्षकाला चोपले. या प्रकाराने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ उडाला. बंदोबस्तांसाठी केवळ दोनच पोलीस सभागृहात असल्याने शिक्षकांच्या गोंधळ रोखण्यात तेही हतबल ठरले. मारहाण करणाऱ्या शिक्षकाला व्यासपीठावरून अक्षरश: ढकलत खाली काढण्यात आले.
आपण दुसऱ्याला ज्ञान देतो तेव्हा किमान आपण तरी सार्वजनिक ठिकाणी मर्यादा पाळल्या पाहिजेत, एवढेही शहाणपण या मास्तरांना उरले नाही. आज मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना या शाळांवर विश्वास उरला नाही. आणि अशा वेळी मास्तरांचा असा तमाशा लोकांसमोर आला तर आणि असे मास्तरअसतील तर हे लोक तर रिटायर होतील पण मराठी शाळांचे कायमचे नुकसान करून जातील आणि याचा गंभीर परिणाम समाजाला भोगावा लागेल.
या विषयात शिक्षण मंत्र्यांनी जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, तरच या गोष्टींना आळा बसेल...