पुणे वाहतूक पोलिसांचा कारभार,आयुक्तांच्या चारचाकी गाडीला दुचाकीचा ट्रिपल सीटचा दंड

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- वाहतूक पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे. पोलिसांनी अक्षम्य चूक केली असून चक्क चारचाकी गाडीला ट्रिपल सीटची पावती फाडली आहे. हा सर्व प्रकार निगडी मधील सूरज स्वीट येथे घडला असून ही चारचाकी गाडी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे.

सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या एम. एच-१४ सी.एल १५९९ चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीटचा दंड ठोठावला आहे. यासाठी त्यांना २०० रुपडे दंड आकारण्यात आला. परंतु चारचाकी गाडीला ट्रिपल सीट दंड कसा हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही एक अक्षम्य चूक असून वाहतूक पोलिसांनी ती मान्य केली.

महानगर पालिका आयुक्त यांच्या गाडीचा नंबर एम.एच-१४ सी.एल १५९९ हा असून सारखाच नंबर एका दुचाकीचा आहे. वाहतूक पोलिसांना सीरियल क्रमांकात डी.एल च्या जागी चुकून सी.एल लिहिले होते. त्यामुळेच आयुक्तांच्या गाडीला पावती फाडली गेली. हा सर्व प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली निगडी वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी दिली असून ती चूक दुरुस्त करून घेतली जाईल असं सांगितलं आहे.

Review