पैशांच्या वादातून तीक्ष्ण शस्त्राने मित्राचा केला खून
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- पैशांच्या वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून मित्राकडून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या घटनेनंतर खून करणारा मित्र स्वत:हून हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला.
राहुल प्रल्हाद पाटील (वय २७, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी, हडपसर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी गौरव उदय पाटील (वय २१, रा. तुकाईदर्शन, फुरसुंगी, हडपसर) याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि गौरव मूळचे जळगावचे रहिवासी आहेत. गौरवने राहुलकडून ५० हजार रुपये हातउसने घेतले होते. दोघांमध्ये हात उसने घेतलेल्या पैशांवरून वाद झाला होता. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राहुल फुरसुंगी भागातील अंजना अपार्टमेंटसमोर थांबला होता. त्यावेळी गौरव तेथे आला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. गौरवने राहुलवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.
राहुलचा खून केल्यानंतर आरोपी गौरव हडपसर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने मित्राच्या खुनाची कबुली दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे तपास करत आहेत.
युवकाचा मृतदेह सापडला
सिंहगड रस्ता भागात फनटाईम चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कालव्याच्या परिसरात मंगळवारी सकाळी युवक मृतावस्थेत सापडला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून ओळख पटलेली नाही. खून झालेल्या युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष आहे. युवकाच्या डोक्यात दगड घालण्यात आला आहे.
भोर परिसरात पुण्यातील व्यावसायिकाचा खून
चार दिवसांपूर्वी शहरातून बेपत्ता झालेल्या व्यावसायिकाचा मृतदेह भोर तालुक्यातील नाणेदांड डोंगरात सापडला. व्यावसायिकाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
रिकबचंद रायचंद ओसवाल (वय ६०) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील नाणेदांड डोंगर परिसरात झुडपामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह सापडल्याची माहिती या भागातील रहिवाशांना रविवारी (१३ जानेवारी) मिळाली. त्यानंतर पोलीस पाटील हनुमंत डेरे यांनी या बाबतची माहिती भोर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा मृतदेहाचे हात-पाय बांधण्यात आले होते. डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. पोलिसांकडून सोमवारी दिवसभर मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, पुण्यातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ओसवाल यांचा हा मृतदेह असल्याची माहिती सायंकाळी पोलिसांना मिळाली.
ओसवाल १० जानेवारीपासून घरातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून या बाबत तक्रार देण्यात आली होती. मात्र, ओसवाल यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. ओसवाल यांच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरूआहे. अद्याप कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत, अशी माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली.