शिवजयंतीनिमित्त महापालिकेने ‘शिवसप्ताह साजरा’ करावा,मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महापालिकेने शिवसप्ताह साजरा करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या जयंतीनिमित्त भक्‍ती-शक्‍ती चौकात तीन दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत, शिवजयंती साजरी करण्यात कंजुषी दाखविली, तर महापालिकेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या जातात. त्याकरिता लाखो रुपये खर्च केले जातात. राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती देखील महापालिका प्रशासनाने मोठ्या स्वरूपात साजरी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने ११ नोव्हेंबर २०१७ रोजी काढलेला अध्यादेश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दाखवित शिवजयंती साजरी करण्यास महापालिका अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे शिवजयंती देखील मोठ्या स्वरूपात साजरी करावी. त्यानिमित्ताने शिवसप्ताहांतर्गत शाळांमध्ये बालशिवाजी स्पर्धा, निबंध, वक्‍तृत्व, चित्रकला, पोवाडा गायन स्पर्धा आयोजित कराव्यात. तसेच विजेत्या स्पर्धकांना शिवचरित्र पुस्तक, स्मृतीचिन्ह व मानधन देण्यात यावे. याशिवाय शिवजयंतीनिमित्त तीन दिवस भक्‍ती-शक्‍ती चौकात प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जीवन बोराडे, प्रकाश जाधव, सतीश काळे, नकुल भोईर, सागर तापकीर, वैभव जाधव, धनाजी येळकर-पाटील, युवराज कोकाटे, नानासाहेब वारे, मारुती भापकर, प्रवीण पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Review