डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडून डेक्कन पीएमपीएमएलचे बसस्थानक

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)-डेक्कन येथील पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बस स्थानक डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडून घेण्यात येणार आहे. मेट्रो स्टेशनअंतर्गत पीएमपीएमएलचे बसस्थानक करण्याचा विचार असून त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती वनाज ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गात शिवाजीनगर, स्वारगेट आणि डेक्कन या तीनही ठिकाणी मेट्रोचे स्टेशन असणार आहेत आणि या तीन ठिकाणी बसस्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर बसस्थानक आणि स्वारगेट येथील बसस्थानक मेट्रो स्टेशनला जोडून घेण्यात येणार आहे. नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी पीएमपीएमएल बसचा वापर करता यावा यासाठी बससह इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मेट्रो स्टेशनला जोडून घेण्यात येणार आहे.

डेक्कन येथील पीएमपीएमएलचे बसस्थानकही असेच मेट्रो स्टेशनला जोडून घेतल्यास या ठिकाणीही अशीच सोय होणार आहे. महामेट्रो आणि पीएमपीएमएल प्रशासन यांच्यात बसस्थानक आणि मेट्रो स्थानक एकाच ठिकाणी जोडण्याविषयी बोलणी सुरू आहे.

 

 


Review