अवघ्या ९ वर्षाचा मावळा सातासमुद्रापार भगव्यासह तिरंगा फडकविणार-साई कवडे ‘माउंट किलीमांजारो’ सर करण्याच्या मोहिमेवर

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपळे निलख येथील अवघ्या ९ वर्षाचा मावळा सातासमुद्रापार भगवा आणि तिरंगा फडकविणार आहे. साई सुधीर कवडे असे या धाडसी बाल गिर्यारोहकाचे नाव आहे. स्वत:च्या वाढदिवसाची आपल्या आई-वडिलांना अनोखी भेट देण्यासाठी साई आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेला पर्वत ‘माउंट किलीमांजारो’ हे शिखर २६ जानेवारी रोजी सर करणार आहे.

या मोहिमेत त्याला भक्कम पाठिंबा मिळाला तो म्हणजे अवघ्या २२ मिनिटात कोणत्याही साधन सामुग्रीचा वापर न करता लिंगाणा सर करणारा गिर्यारोहक अनिल वाघ याचा. तसेच एक पाय व एक हात जन्मताच अधू असलेला अकोला जिल्ह्यातील दिव्यांग धीरज कळसाईत हा युवक त्याच्या बरोबर सहभागी असणार आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे जवान तुषार पवार हे देखील असणार आहेत. खास बाब म्हणजे या मोहीमेचे नेतृत्व कुमारी प्रियांका गाडे ही करणार आहे.

पिंपळे निलख येथे राहणारा ९ वर्षाचा साई सुधीर कवडे बालेवाडीच्या भारती विद्यापीठ येथे इयत्ता चौथीत शिकत आहे. त्याला लहानपणापासूनच गिर्यारोहनाची आवड आहे. त्याने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील ७० हुन अधिक गडकिल्ले पादाक्रांत केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर व सर्वात अवघड समजला जाणारा किल्ला लिंगाणा ज्याचे नुसते नाव घेतले तरी अंगावर काटा येतो, भले भले कसलेले गिर्यारोहकही हा गड सर करण्यासाठी दहा वेळा विचार करतात. हा अशक्यप्राय असा गगनाला भिडलेला अभेद्य गड या चिमुकल्या मावळ्याने महाराजांचा वेश परिधान करून चढाई केला आहे.

आता तो आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेला पर्वत ‘माउंट किलीमांजारो’ सर करणार आहे. टांझानिया देशातील ईशान्य भागात केनियाच्या सीमेजवळ हा पर्वत आहे. या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. या मोहिमेसाठी २१ जानेवारी रोजी मुंबई येथून सर्वजण टांझानियाला निघणार आहेत. २६ जानेवारीला भारताच्या गणराज्य दिनी भारताचा तिरंगा व महाराष्ट्राचे अस्मितेचे प्रतिक असलेला भगवा ध्वज ‘माउंट किलीमांजारो’ या शिखरावर फडकविणार आहेत.

या मोहिमसाठी विशेष सहकार्य जेष्ठ गिर्यारोहक सुशिल दुधाणे करणार आहेत. तर या मोहिमेस अर्थसाहाय्य धनंजय ढोरे व अमित पसरणीकर यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

Review