पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र कामगार कार्यालय स्थापन करा,मुख्यमंत्र्याकडे मागणी

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवड ही कामगार व औद्योगिकनगरी असल्याने शहरातील कामगारांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र “हायटेक व सुसज्ज कामगार कार्यालय” उभारण्यात यावे अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष तथा बांधकाम कामगार सेनेचे उपाध्यक्ष किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात पुणे जिल्हा कामगार उपआयुक्त कार्यालयांतर्गत चिंचवड येथे दुकाने निरीक्षक कार्यालय व माथाडी बोर्ड अस्तित्वात असुन अत्यंत हालाकीच्या व नादुरुस्त इमारतीमध्ये जुनाट पध्दतीने कारभार सुरू आहे तरी नवीन ठिकाणी प्रशस्त व सुसज्ज इमारतीमध्ये शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र कामगार कार्यालय उभारणे गरजेचे आहे, आता नुकतेच शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन झाले असुन त्याच धर्तीवर कामगार कार्यालयाचा गांभीर्याने विचार करून हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

किशोर हातागळे यांनी मुख्यमंत्री यांना या मागणीचे निवेदन दिले असुन त्यात असे म्हणले आहे की, “पुणे जिल्हा कामगार उपआयुक्तांच्या अखत्यारीत असणाऱ्या चिंचवड कार्यालयाला अक्षरशः दारीद्रयाची कळा आली असुन सन १९८५ सालापासुन कार्यरत असणाऱ्या या शासकीय कार्यालयाची अतिशय भयानक अवस्था झालेली आहे, याच कार्यालयात दुकाने निरीक्षक कार्यालय व माथाडी बोर्डाचे शासकीय कार्यालय असल्याने नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

चिंचवड येथे असणाऱ्या या कार्यालयाची इमारत ही खुप जुनी असुन तुटलेल्या खिडक्या व पायऱ्यांचे लोखंडी संरक्षक ग्रील बऱ्याच वर्षापासुन तुटलेलेच आहेत तसेच बाहेरील आवारात विद्युतदिवेही नाहीत त्यामुळे ये जा करताना काळजी घ्यावी लागते, बऱ्याच दिवसांपासुन भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली नसुन कार्यालयात जुनाट फर्निचर व मातीच्या ढिगाऱ्यात असणारी कागदपत्राचे गठ्ठे यामुळे या कार्यालयाचे वातावरण नेहमीच उदासीन असते.

या कार्यालयातील कार्यक्षेत्रात पिंपरी चिंचवड, चाकण, मुळशी, खेड, आंबेगाव इत्यादी भागाचा समावेश होतो सुमारे दिड लाख दुकाने या कार्यालयांतर्गत येतात, त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्राचे कार्यालय एवढे जुनाट व भयानक अवस्थेत आहे, या कार्यालयाचा परिसरही अस्वच्छ असुन कचऱ्याच्या ढीगातुन वाट काढत कार्यालयात जावे लागते आणि तेथे गेल्यावरही अशीच भयानक परिस्थिती बघावी लागते, देशातील व राज्यातील सर्वच शासकीय कार्यालये हायटेक होत असताना चिंचवड येथील कार्यालय अपवाद ठरत आहे त्यामुळे याही कार्यालयाला हायटेक करण्यासाठी या ठिकाणच्या कार्यालयाचे स्थलांतर करून प्रशस्त इमारतीमध्ये नव्याने नुतनीकरण करण्यात यावे, पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झालेले आहे त्याच धर्तीवर संघटीत व असंघटित कामगारांच्या हितासाठी पिंपरी चिंचवड शहरालाही स्वतंत्र कामगार कार्यालयाची आवश्यकता आहे, पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी असल्याने मोठ्या प्रमाणावर कामगार येथे वास्तव्यास आहेत तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार, माथाडी कामगार, व इतर असंघटित कामगार येथे मोठ्या प्रमाणात असुन त्यांना शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा कामगार उपआयुक्त कार्यालयात जाऊन शासकीय योजनेचा लाभ घेण्यास खुप अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे याच ठिकाणी पिंपरी चिंचवडसाठी पुणे जिल्हा कामगार उपायुक्त यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र कामगार कार्यालयाची निर्मिती करून सर्व कामगारांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा” असे त्यात नमुद केले आहे.

Review