शिवजयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
निगडी,(सह्याद्री बुलेटीन)- छत्रपती शिवरायांचा विचारांचा प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समूह उद्यान येथे हा शिवसप्ताह आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरात शिवजयंती उत्सव साजरा करण्याबात आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अमित गावडे, विकास डोळस, आयुक्त श्रावण हर्डीकर, मराठा क्रांती मोर्चाचे जीवन बोराडे, धनाजी येळकर-पाटील, सतीश काळे, वैभव जाधव, नानासाहेब फुगे, विशाल यादव आदी उपस्थित होते. त्यावेळी महापौर जाधव यांनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवराय प्रबोधन पर्वानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम-पोवाडा स्पर्धा, प्रबोधनात्मक व्याख्याने, कीर्तन असे या कार्यक्रमांचे स्वरुप असणार आहे. त्याबाबतचे विविध कार्यक्रम लवकरच निश्चित करण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांमध्ये छत्रपती शिवराय प्रबोधन पर्व निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सुचनाही महापौर राहुल जाधव यांनी या बैठकीत दिल्या.