साताऱ्यात शालेय विद्यार्थ्यांचा विश्वविक्रम, १२०० जणांनी साकारला भारताचा नकाशा

सातारा,(सह्याद्री बुलेटीन)-मतदान राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या पुढाकारातून ” १२०० शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून २०० x २०० एवढा भव्य मानवी प्रतिमांचा भारतीय नकाशा आणि मतदान करा ” हा संदेश साकारण्यात आला. याची नोंद ग्लोबल रेकॉर्ड & रिसर्च फौंडेशन च्या चिल्ड्रेन्स रेकॉर्ड मध्ये करण्यात आली.

विश्व विक्रमाचे प्रमाण पत्र प्रदान प्रसंगी साता-याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अनेक विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहेत, असे डॉ दीपक हारके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका बी के सुवर्णा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे , जिल्हा उपनिवडणूक अधिकारी पुनम मेहता, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, क्रीडा अधिकारी युवराज नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.

हा मानवी नकाशासाठी जे १२०० विद्यार्थी सहभागी झाले त्यात साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालय , छत्रपती शाहू अकादमी , भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर , महाराजा सयाजीराव विद्यालय , सेंट पॉल स्कूल , शानबाग स्कूल , जे डब्ल्यू आयर्न अकादमी या शाळांचे विद्यार्थी होते.

भारताचा अतिशय सुबक २०० बाय २०० फुटांच्या नकाशाचे आरेखन सर्वश्री कलाशिक्षक विनायक संकपाळ , गजानन पाडळे , सागर सुतार , घनश्याम नवले , क्रीडा शिक्षक सर्वश्री आर. व्ही. माने , संजय अहिरेकर , व्हि.जे. यादव , एस. एम. बारंगळे आदीनी यासाठी काम केले. या कार्यक्रमाच्या सयोजनात साताऱ्याच्या उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख , जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शबनम मुजावर यांचा सहभाग होता.

100 टक्के मतदानकरुन आपली लोकशाही बळकट करु या – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

मतदानाचा अधिकारी हा आपल्याला मोठ्या संघर्षाने मिळालेला आहे. याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये 100 टक्के मतदान करुन आपली लोकशाही अधिक बळकट केली पाहिजे, असे आवाहन सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.

25 जानेवारी या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या प्रसंगी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शबनम मुजावर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यात नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना मान्यवरांच्या हस्ते बॅचेसचे वाटप. तसेच मतदार जागृतीपर आयेाजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आदी स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी उपस्थित सर्वांना मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयार आम्ही एक ते दिड वर्षापासून करत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, मतदानाचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याला संविधाने दिला आहे. मतदनाच्या दिवशी मतदान करण्यासाठी शासनाकडून सुट्टी देण्यात येते या सुट्टीचा वापर पहिल्यांदा मतदानासाठी करावा.

शिक्षक, बीएलओ तसेच अंगणवाडी सेविका यांनी रात्रंदिवस काम करुन 1 लाख 10 हजार नवीन मतदारांची नोंदणी केली आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करुन राज्य निवडणूक आयोगाच्या सचुनेनुसार याही वर्षी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्यात लोकशाही निवडणूक व सुशासन या विषयी समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकरी श्वेता सिंघल यांनी शेवटी सांगितले.

नव मतदार हा जबाबदार आहे. शासनाच्या मतदान जनजागृती उपक्रमात नव तरुण मोठ्या उत्साहात सहभागी होतील. लोकशाहीच्या बळकटीसाठी जास्ती जास्त नव तरुण मतदान करेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त करुन मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. यामुळे 25 जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 9 वा राष्ट्रीय मतदार दिन असून या दिनानिमित्त मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते. वंचित ना राहो कोणी हे निवडणूक आयोगाचे घोषवाक्य असून या घोषवाक्यानूसार एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता प्रास्ताविकात सांगितले.

आजोबांनी केले मतदानाचे आवाहन

असे जाणती हे खुण स्वात्म अनुभवी तुका म्हणे पदी ज्याची त्याला अशा वाक्यांना अनुसरुन किर्तनातून प्रबोधन करणारे वरकुटे मलवडी ता. माण येथील शांताराम शंकर सुतार यांनी मतदानाचा अमुल्य हक्क आपल्याला मिळालेला आहे. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भय पणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन केले.

जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मतदानासाठी आम्ही सज्ज आहोत या विषयावरील पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी वृंदा शिवदे यांनी केले तर तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास नागरिक, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदार दिननिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद मैदान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडी दाखवून मार्गस्त केले.

Review