आमदार जगतापांकडून 'ऐतिहासिक बजेट' म्हणून स्वागत, तर संजोग वाघेरेंकडून 'इलेक्शन बजेट'ची टिका
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) - मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करत अर्थंमंत्री पियूष गोयल यांनी शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगारांना मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे. हे बजेट पिंपरी-चिंचवमध्ये भाजपच्या शहराध्यक्षांनी ऐतिहासिक असल्याचे म्हटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी हे इलेक्शन बजेट असल्याचे सांगत टिका केली आहे.
अर्थसंकल्पाविषयी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगारांना मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे. पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत मध्यमवर्गींयांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक धाडसी निर्णय सरकारने घेतले. देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारने केलेले आहे. त्यामुळे सरकारच्या या अर्थसंकल्पावर नागरिकांकडून आनंद व्यक्त असून ऐतिहासिक बजेट असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, केंद्र सरकारचे हे बजेट म्हणजे पुर्णपणे इलेक्शन बजेट म्हणावे लागेल. पाच वर्षाच्या सत्तेत काही न करता आल्यामुळे आगामी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून भाजपने मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी, जीएसटीव्दारे मध्यमवर्गीयांना त्रास दिला. आता सत्ता जाण्याची भिती सरकारला असून ती खरी ठरणार आहे.