पुरावे द्या,अन्यथा माफी मागा; अण्णा हजारेंकडून नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता. त्याबाबत अण्णा हजारे यांच्यावतीने बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठविण्यात आली आहे.

नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यावर हजारे यांच्या समर्थकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गुरूवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हजारे यांनी भेटही नाकारली होती. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती. मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नाही. यामुळे हजारे दुखावले गेल्याने आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे अजित पवार सांगितले होते. मात्र, नवाब मलिक यांनी यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही. त्यामुळे अण्णा हजारे यांचे वकील मिलिंद पवार यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

नोटीस पाठवून अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांनी जाहीर लेखी माफी मागावी व तसा खुलासा करावा तसे न केल्यास फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले व दावे मलिक यांच्या विरोधात दाखल करावे लागतील, असा इशारा कायदेशीर नोटीस रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून नवाब मलिक यांना दिली आहे.

Review