पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी सुविधा केंद्राची; जबाबदारी माहिती तंत्रज्ञान अधिका-याकडे

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी सुविधा केंद्रांची जबाबदारी माहिती व जनसंपर्क विभागाकडून काढून घेण्यात आली आहे. त्याऐवजी माहिती तंत्रज्ञान अधिका-यांकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बदलाचा आदेश दिला आहे.

शहरातील नागरिकांना लागणारे विविध दाखले व महत्वाची कागदपत्रे काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्र स्थापन केली आहे. कंत्राटी पद्धतीने ही केंद्र चालवायला दिली आहेत. त्यामुळे महापालिका मुख्यालयात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले आहे. या नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या प्रशासन अधिका-याकडे होती. मात्र, दिवसेंदिवस या नागरी सुविधा केंद्रांची वाढती व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेता यामध्ये बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार प्रशासन अधिकारी पदावरील अधिका-याला सहाय्यक आयुक्‍त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान अधिकारी श्रीधर पवार यांच्याकडे नागरी सुविधा केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तथापि, धोरणात्मक निर्णयाबाबत अथवा महत्वाच्या विषयाबाबत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांच्या मान्यतेने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Review