पुणे महापालिकेच्या स्थायी सदस्यांची नियुक्ती 20 फेब्रुवारीला
पुणे, (सह्याद्री बुलेटीन)– महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चांगलीच चुरस लागणार आहे. समितीच्या 8 सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असून त्यात भाजपच्या सहा सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारी महिन्याच्या मुख्यसभेत केली जाणार आहे. तर मुदत संपणाऱ्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांचाही समावेश आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडे स्थायी समितीची सुत्रे आहेत. 16 सदस्यांच्या समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 तर शिवसेना आणि कॉंग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यातील 8 सदस्यांचा 2 वर्षांचा कार्यकाल येत्या 28 फेब्रुवारीला संपत आहे. यात भाजपचे सहा सदस्य भाजपचे असून त्यात सुनील कांबळे, मंजूषा नागपूरे, निलिमा खाडे, कविता वैरागे, राजा बराटे तसेच आबा तुपे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान गटनेते दिलीप बराटे आणि आनंद अलकुंटे यांचा कार्यकाल संपणार आहे. या सदस्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सदस्यांची नियुक्ती 20 फेब्रुवारीच्या मुख्यसभेत केली जाणार आहे.
आरपीआयला हवे सदस्यपद
कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक सहा सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये समितीत जागा मिळविण्यासाठी सर्वाधिक चुरस असणार आहे. तर भाजपच्या चिन्हावर लढलेल्या रिपाइंकडूनही एका सदस्यपदाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप काय निर्णय घेते, यावर समितीची गणिते असणार आहेत. त्यातच समितीमधील उर्वरीत चार सदस्यांसह नवीन सदस्यांमध्ये समितीच्या अध्यक्षपदासाठी चढाओढ असणार आहे. मागील वर्षी समितीत आलेले विद्यमान अध्यक्ष योगेश मुळीक यांनी थेट अध्यक्षपदच मिळविले होते. त्यामुळे उर्वरीत चार सदस्यांमधून अध्यक्षपद देणार की पुन्हा नवीन सदस्याची वर्णी लागणार याबाबत महापालिकेत खलबते सुरू आहेत.