शिरुरमध्ये सेना-राष्ट्रवादीत जुंपली; आढळरावांविरुध्द विलास लांडेंची उमेदवारी पक्की

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांची उमेदवारी पक्की झाली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये आढळराव-लांडे यांच्यात आचारसंहिता लागण्याआधीच जुंपली असून विधानसभानिहाय आढावा, मेळावे सुरू झाले आहेत. 

लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ येत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे सक्रीय झाले आहे. भाचेजावई आमदार महेश लांडगे यांच्याशी त्यांनी जुळवून घेतल्याची चर्चा आहे. त्याबरोबर लांडे यांच्याकडून थेट खासदार आढळरावांवर होत आरोप सुरू असून त्याला आढळरावांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ते सध्या शिरुर मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय आढावा बैठका, मेळावे आणि कार्यक्रमांवरून दिसते आहे. 

लांडे यांनी शिरुर मतदारसंघातील भोसरीबरोबर हडपसरबरोबर शिरुर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा यात्रे निमित्त सेना-भाजपवर शरसंधान त्यांनी साधले. एवढेच काय तर, आता माजी महापौर असलेल्या विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडेही मतदारसंघात प्रचारासाठी फिरू लागल्या आहेत. लांडेंची मोर्चेबांधणी सुरू असली, तरी आढळराव देखील मुरब्बी राजकारणी असल्याने लांडे यांना सडेतोड उत्तर देण्याची कसर तेही सोडताना दिसत नाहीत. 

Review