पुणे – केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची प्रशासकीय तयारी

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)– केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून पुणे जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या याद्या तयार होतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

या योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कुटुंबाला प्रति वर्षी सहा इतके अर्थ सहाय्य तीन टप यात दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबाची सर्व ठिकाणचे मिळून लागवडी लायक एकूण क्षेत्र दोन हेक्‍टर किंवा त्यापेक्षा कमी अशा अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. हा लाभ ज्या कुटुंबामध्ये पती-पत्नी व त्याची 18 वर्षाखाली मुले आहेत यांनाच मिळणार आहे. त्यासाठी अशा कुटुंबाचे वर्गीकरण गावच्या तलाठ्यामार्फत केले जाणार आहे. यादी तयार करताना खातेदाराच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 रोजी असलेले क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला स्वयंघोषणा पत्र सादर करावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेचा लाभ आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्‍ती, निवृतीवेतनधारक व्यक्‍ती ज्यांचे मासिक निवृतीवेतन दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे सर्व तसेच डॉक्‍टर, वकील, सीए, आर्किटेक्‍ट व संबंधित क्षेत्रातील व्यक्‍तींना याचा लाभ घेता येणार नाही.

योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर नियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरील 7 सदस्यीय समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर निवासी उपजिल्हाधिकारी समन्वयक तथा नोडल अधिकारी आहेत. तालुका स्तरावरील 6 सदस्यीय समितीचे उपविभागीय (प्रांत) अधिकारी अध्यक्ष, तर तहसिलदार समन्वयक तथा नोडल अधिकारी आहेत, ग्रामस्तरावर चार सदस्यीय समिती असून त्याचे तलाठी प्रमुख असणार आहेत.

गावनिहाय पात्र शेतकऱ्याची यादी पुढील आठवड्यात तयार होणार आहे, ग्राम पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकत घेतल्यास तालुका समितीकडे दाद मागता येणार आहे. अशा यादीवर शेतकऱ्याला 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हरकत घेता येणार आहे. तर, यादीमध्ये 21 फेब्रुवारी पर्यंत दुरुस्त्या करता येणार आहेत. अंतिम यादी 26 फेब्रुवारीपर्यंत महाऑनलाइनने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाइटवर अपलोड केली जाणार आहे.

 

Review