पुणे – निवृत्त प्राध्यापकांना मिळणार पाच वर्षे गाइडशिप
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)–सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधील निवृत्त प्राध्यापकांना आता पाच वर्षे पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी गाईडशिप करता येणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या बुधवारी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक बुधवारी झाली. या बैठकीत परिषदेचे सदस्य प्राचार्य सुधाकर जाधवर आणि सुनेत्रा पवार यांची विद्या परिषदेचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड केल्याचे जाहीर करण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार प्राध्यापक निवृत्त झाल्यानंतर त्याच दिवसांपासून त्यांची पीएच.डी. व एम.फिल. गाइडशिप संपुष्टात येत होती. यामुळे गाइड निवृत्त झाल्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांना दुसरे गाइड मिळविण्यासाठी धडपड करावी लागत होती. मात्र, आता नवीन निर्णयामुळे त्यांच्याकडे संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना आपली पीएच.डी. अथवा एम.फिल. पूर्ण करता येणार आहे.
विद्यापीठाकडून विविध संशोधन संस्थांशी करार करून येत्या शैक्षणिक वर्षांपासून नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. या अभ्यासक्रमांना विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. काही अभ्यासक्रमांमधील सुधारणांना मंजुरी देण्यात आली.
सध्या डेटा सायन्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीच्या मोठ्या संधी डेटा सायन्समध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नव्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी डेटा सायन्समध्ये डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सी-डॅक आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन डेटा सायन्सेस यांच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम लवकर सुरू करण्यात येणार असून त्यासही मान्यता देण्यात आली आहे.
आयुकाच्या महत्त्वाकांक्षी लायगो इंडिया प्रकल्पासाठी कुशल मनुष्यबळ व्हावे यासाठी “मास्टर्स इन अॅस्ट्रोफिजिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासोबतच बहुचर्चित अवकाशातील मोहिमांसाठी संशोधक तयार करण्याच्या हेतूने “मास्टर्स इन अॅस्ट्रोबायोलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. विद्यापीठातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस) यांच्या मदतीने तो सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे.