मोदींचे आसाममध्ये काळ्या झेंड्यांनी स्वागत आणि 'मोदी गो बॅक'च्या घोषणा
आसाम,(सह्याद्री बुलेटीन) – मोदी सरकारने आणलेल्या नागरिकता सुधारणा विधेयकाला आसाममध्ये दिवसेंदिवस विरोध वाढत चालला असून. शनिवारी म्हणजेच आज आसाम दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या ईशान्येकडील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी ते गुवाहाटी विमानतळावर उतरले आणि राजभवनकडे निघाले होते. या रस्त्यामध्येच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. आसामच्या विविध भागात मोदीविरोध कमालीचा तीव्र झाला असून ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्याचा तसेच काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने जमावबंदी लागू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्यासभेमध्ये काळे झेंडे दाखवण्याची किसान मुक्ती संघर्ष समिती आणि विद्यार्थी संघटना असलेल्या 'आसू'ने घोषणा केली होती. केंद्र किंवा राज्य सरकारने कितीही बंदी घालू द्या आम्ही त्याचे उल्लंघन करत निषेध करणारच असं आसाममधल्या संतापलेल्या विविध संघटनांनी जाहीर केलं होतं. नागरिकता सुधारणा विधेयक जोपर्यंत मागे घेतलं जात नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचं आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी सांगितलं आहे.
काय आहे नागरिकता सुधारणा विधेयक ?
पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान या तीन देशातील बिगर मुस्लिम व्यक्तींना हिंदुस्थानी नागरिकत्व देण्याबाबतचे हे विधेयक असून हे विधेयक संमत झाल्यास या तीन देशांमधून हिंदुस्थानात आलेले अल्पसंख्य विशेषत: हिंदूंना कायमस्वरूपी नागरिकत्व देता येऊ शकेल. हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाले असून ते राज्यसभेसमोर प्रलंबित आहे. आसाम या विधेयकाच्या सुरुवातीपासून विरोधात आहे.