काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात स्वत:ची घरे भरली – पंकजा मुंडे
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- राज्यभर विरोधक भारतीय जनता पार्टीवर आरोप करत सुटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात स्वत:ची घरे भरली. बगलबच्चे मोठे केले; परंतु भाजपने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले. दलालांची फौज बंद केली, अशी टीका राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
गावजत्रा मैदान, भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून पूजा महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘इंद्रायणी थडी’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, प्रदेश सचिव उमा खापरे, सुनील शेळके, विजय फुगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माता रमाबाई आदी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले.
महाभारतात कृष्ण कौरवांच्या मागे नव्हे; तर पांडवांच्या माध्यमातून धर्माच्या पाठीमागे उभे राहिले. जनतारूपी कृष्ण हा भाजपच्या पाठीमागे असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणमंत्रिपदी एका महिलेची निवड करून खर्या अर्थाने स्त्रीशक्तीला मोठे करण्याचे काम केले आहे.
त्यांचाच आदर्श घेऊन राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. बचत गटाची शक्ती आम्ही ओळखली असल्याने महाराष्ट्रात बचत गटांना मोठे करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले असून, 8 जिल्ह्यांवरून 26 जिल्ह्यांत महिला बचत गट सक्षम केले असल्याचा विश्वास मुंडे यांनी या वेळी व्यक्त केला.
गोपीनाथ मुंडे यांचे भोसरीवर प्रेम होते. आमदार महेश लांडगे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढले नसले, तरीही ते सध्या आमच्याबरोबर असल्याने ते आमचे मित्र आहेत. मुंडेसाहेब आज असते, तर त्यांना निश्चित त्यांनी ताकद दिली असती; मात्र त्यांच्या पश्चात त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तसेच राज्यातील वंचित घटकांचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने आमदार लांडगे यांना निश्चित ताकद देणार आहे, असा आशावाद मुंडे यांनी व्यक्त करत ‘इंद्रायणी थडी’च्या माध्यमातून स्त्रीशक्तीला प्रबळ बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याबद्दल आ. महेश लांडगे, पूजा लांडगे यांचे मुंडे यांनी आभार व्यक्त करीत महिलांच्या प्रगतीसाठी मी आणि माझे सरकार निश्चित प्रयत्न करील, असे प्रतिपादन केले.
या वेळी बोलताना महेश लांडगे म्हणाले की, इंद्रायणीच्या पवित्र काठावर राहणारी आपण माणसे आहोत. संत ज्ञानेश्वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा सांप्रदायिक वारसा आपण जपत आहोत. त्यामुळे याला ‘इंद्रायणी थडी’ असे नाव देण्यात आले असून, महिलांना व्यासपीठ निर्माण होण्यासाठी ही थडी भरविण्यात आली आहे. प्रास्ताविक महिला बालकल्याण सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी, तर आभार महापौर राहुल जाधव यांनी मानले.