सरकारविरोधी मतं मांडणारी किती तोंडं तुम्ही बंद करणार ?- धनंजय मुंडे यांची सरकारवर टीका

पुणे,(सह्याद्री बुलेटीन) – शनिवारी सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपले भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

सांस्कृतिक, कलाविषयक धोरणांवर टीका केल्याने ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवलं. यावरून कला क्षेत्राशी संबंधित संस्थांचे स्वातंत्र्यही धोक्यात आले असल्याचे दिसते, असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच सरकारविरोधी परखड मतं मांडणारी किती तोंडं तुम्ही बंद करणार? असा सवाल सरकारला केला आहे. आणि ही लोकशाही आहे, विचारांचा आदर करा, असा सल्ला सरकारला दिला आहे.

दरम्यान, शनिवारी मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना टीका करण्यापासून रोखलं. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले आणि भाषण लवकर संपवण्यास सांगितलं.त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते. शनिवारी हा संतापजनक प्रकार घडला.

Review