बुलढाण्यात कोट्यवधींच्या बोगस नोटांची खळबळ!

बुलढाणा,(सह्याद्री बुलेटीन)- जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या बोगस नोटा पकडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून बाकीचे फरार झाले आहेत.

मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील आश्रमशाळेच्या मागे असलेल्या शेतात बोगस नोटा घेऊन काही जण आले असल्याची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शेतात छापा मारून किसन गजानन तायडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सापडलेल्या काळ्या बॅगमध्ये दोन हजारांच्या गड्ड्या आढळल्या. विशेष म्हणजे या गड्ड्यांना पहिली नोट खरी लावण्यात आली होती. बाकीच्या नोटा बोगस होत्या. पोलिसांना पाहताच बाकीचे आरोपी पळाले. पोलीस कर्मचारी तय्यब अली व सुनील भवटे यांनी ही कारवाई केली.

बोगस नोटा मोजण्याचे काम दोन पंचांच्या साक्षीने करण्यात आले. या नोटा सव्वा कोटीपेक्षा जास्त असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. निवडणुका जवळ येत असल्यामुळे बोगस नोटांचा सुळसुळाट वाढणार आहे, अशी माहितीही या सूत्रांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

Review