दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे;परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनीद्वारे मोफत समुपदेशन
पुणे,(सह्याद्री बुलेटीन) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनीद्वारे मोफत समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी विभागनिहाय समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. इयत्ता बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च, तर इयत्ता दहावीच्या परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार असून त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे.
परीक्षेच्या कालावधीत बहुसंख्य विद्यार्थ्यांना नकारात्मक विचाराने व परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येते. या विद्यार्थ्यांना उत्साहाने परीक्षा देता याव्यात आणि त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याची आवश्यकता असते. यासाठी राज्य मंडळाच्या वतीने दरवर्षी समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येत असते. या विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असतो.
यंदाही विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधित माहिती समुदेशकांना विचारू नये, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी संपर्क साधा…
समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांनी 7767960804, 7066475360, 8668392232, 8459112133, 9619643730, 7796874474, 9561220152, 8530608947, 7066128995, 7387501892 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधवा, असे आवाहनही करण्यात आले आहे.