पिस्तुलाच्या धाकाने लुटणार्‍यांना गुन्हे शाखेने केले जेरबंद

पुणे,(सह्याद्री बुलेटीन)-उच्चभ्रू अन् शांत समजल्या जाणार्‍या आपटे रस्त्यावरील बंगल्यात भरदिवसा शिरून ज्येष्ठांसह चौघांना पिस्तुलाच्या धाकाने डांबून पाच लाखांचा ऐवज लुटणार्‍यांना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. तसेच चालकाचे अपहरण करून 1 कोटी खंडणी मागणार्‍यांचाही छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. 30 वषार्र्ंपासूनचा विश्‍वासू कार चालकाच्या मुलानेच या दरोड्याचा कट रचला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.


दीपक शिवाजी मेदगे (वय 38), किरण किशोर तावडे (वय 36), पारस ठाकूर सोलंकी (वय 28), सचिन स्टॅनी डिसोजा (वय 28), गणेश जनार्दन गोरे (वय 24) या पाच जणांना अटक केली आहे. तर, अब्दुल हादी रिजवान ऊर्फ भाईजान सत्तार शेख, रविशकुमार लक्ष्मणप्रसाद सोनी (सर्व रा. मुंबई) यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हंसराज खेमका (वय 84) यांचा आपटे रस्त्यावर सरोज सदन हा बंगला आहे. त्यांना हा बंगला विकायचा आहे. त्यामुळे ते पुण्यात येतात. त्यांची मेहुणी हेमा छेडा (वय 64) याही त्यांच्यासोबत येत असत. या वेळी त्यांचा तीस वर्षांपासूनचे विश्‍वासू चालक शिवाजी मेदगे हे सोबत असत. 16 जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चौघे जण बंगल्यात शिरले. पिस्तूल व चाकूचा धाकाने हेमा यांच्यासह नोकरांना तोंडाला चिकटपट्टी लावून खोलीत डांबले आणि दागिने व रोकड असा 5 लाख 70 हजारांचा ऐवज लुटला. यानंतर 1 कोटीची मागणी केली होती. पैसे मुंबईतून मिळतील असे सांगितल्यानंतर त्यांनी चालक शिवाजी मेदके यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून एकाने मुंबईला नेले. दरम्यान, या बंगल्याचे दार वाजल्याने घरात उर्वरित दोघे गॅलरीतून उड्या मारून पळून गेले. याचा तपास गुन्हे शाखा करत होती. या प्रकरणात जवळची व्यक्ती सहभागी असल्याचा संशय होता. तर सीसीटीव्हीची पडताळणी केली होती. त्यात शिवाजी मेदगे यांचा मुलगा दीपक घटनेच्या पूर्वी काही काळ त्याठिकाणी आढळून आला होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुन्ह्याचा कट उघड झाला. त्याच्याकडून कारसह 10 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्योतिप्रिया सिंग, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे उपनिरीक्षक दिनेश पाटील, कर्मचारी योगेश जगताप, सुधीर माने यांना केली.

Review