नव-उद्योजकांना व्यवसायासाठी मूलभूत सुविधांच्या मिळण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे अभय भोर यांचे मागणीचे निवेदन

 पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-(दि.१३.फेब्रु.) पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरामध्ये नव-उद्योजकांना व्यवसायासाठी जागा आणि मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी मुंबई येथे नुकतीच भेट घेतली व त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, सरकार नुसते घोषणा देते. सरकारने आतापर्यंत मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया व स्टॅंड अप इंडिया इत्यादी घोषणा केल्या. परंतु, त्या घोषणा अमलात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी जागाच उपलब्ध नाही. उलट आहे त्या जागांवर रेसिडेंशियल टाऊनशिप उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर असेच होत राहिले, तर एकेकाळी महानगरपालिकेचा आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका म्हणून लौकिक होता, त्यास धक्का पोहचू शकतो.

महानगरपालिकाही उद्योजकांच्या कष्टावरच मोठी झालेली आहे. येथील उद्योग एमआयडिसी सोडून दुसरीकडे स्थलांतरीत होतील. उद्योजकांना कुठल्याही मूलभूत सुविधा देत नाही. महानगरपालिकेला वारंवार निवेदने देऊन, बैठका घेऊन, एमआयडीसीसारख्या मोठ्या परिसरात महिला कामगार व इतर कामगारांसाठी टॉयलेटचीसुद्धा आतापर्यंत उभारणी करण्यात आली नाही. उद्योजक अनेक समस्यांनी ग्रासले असून, त्यात काही उद्योगांना शाहीस्तेकर लावण्यात आलेला आहे. तरी लवकरात लवकर मूलभूत सुविधा व ह्या गोष्टीवर योग्य पर्याय काढण्यात यावा. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयासमोर मुंबई- चाकण-तुर्भे-पिंपरी-चिंचवड येथील सर्व उद्योजक मिळून आंदोलन करतील, त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी लवकरात लवकर उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच स्थानिक महानगरपालिका व एमआयडिसी अधिकारी यांची बैठक बोलविण्यात येईल. त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन, उद्योजकांच्या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी भोर यांना दिले आहे.

Review