महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ प्रदान

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती गायकवाड यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार (शहरी विभाग) विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी निंबकर कृषी संशोधन संस्था (नारी) चे संचालक डॉ. अनिल राजवंशी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी यांच्या उपस्थितीत होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, महाविद्यालय विकास समितीचे व जनरल बॉडीचे सदस्य मा. संजोगजी वाघेरे-पाटील, संस्था पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड याच वर्षी महात्मा फुले महाविद्यालयात रुजू झाले आणि अल्पावधीतच त्यांनी महाविद्यालयात विविध सुधारणा घडवून आणल्या आणि महाविद्यालयास ‘कॉलेज एज्युकेशन डेव्हलपमेंट ऑथारिटी’ (सेडा) कडून नाविन्यपूर्ण कल्पना राबविणारे महाविद्यालय (बेस्ट इन्नोव्हेटिव्ह कॉलेज) पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दाखल घेऊन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे या नामवंत संस्थेने त्यांची विश्वस्त पदी निवड नुकतीच केली आहे.


प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय पुढीलप्रमाणे देता येईल प्राचार्य गायकवाड हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक असून प्राचार्य म्हणून त्यांनी तेरा वर्षे विविध महाविद्यालयात कामकाज पाहिले आहे. आजपर्यंत त्यांना पुणे विद्यापीठात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेटचे सदस्य, विद्यार्थी कल्याण मंडळावर सल्लागार, सुवर्णपदक निवड समिती सदस्य, वार्षिक अहवाल समिती सदस्य, पीएच.डी. साठी मार्गदर्शक अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत. याचीच फलश्रुती म्हणून आजपर्यंत त्यांना रयत शिक्षण संस्थेचा गुणवंत सेवक पुरस्कार, संग्राम प्रतिष्ठानचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय गुणगौरव समितीचा आदर्श प्राचार्य पुरस्कार इ. पुरस्कारांनी गौरविलेले आहे. या कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणूनच पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून मिळालेला हा पुरस्कार आहे.

 

Review