कल्याण: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ अभाविपने जाळला पाकिस्तानचा झेंडा

कल्याण,(सह्याद्री बुलेटीन)-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवनांनवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद कल्याण शहरातही उमटलेले पाहायला मिळाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला तर बिर्ला महाविद्यालयात अभाविपने पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला निषेध व्यक्त केला. सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी रुजू होणाऱ्या ४० पेक्षा अधिक सीआरपीएफ जवान कालच्या अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी पडले. या भ्याड हल्ल्याबद्दल देशभरातून संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

कल्याणामध्येही या हल्ल्याचे आज पडसाद उमटले. कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड, नविन गवळी ,निलेश शिंदे यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच यावेळी काढण्यात आलेल्या निषेध रॅलीमध्येही शेकडो नागरिकांनी सहभाग घेत या हल्ल्याचा निषेध केला. तर कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयात अभाविपने पाकिस्तानचा झेंडा जाळून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी आणि पत्रकार यांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

Review