आदिलच्या कृत्याची लाज वाटतेय! कुटुंबियांनी दिली प्रतिक्रिया
श्रीनगर,(सह्याद्री बुलेटीन)- केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर पुलवामा येथे गुरुवारी हल्ला झाला. या आत्मघाती हल्ल्यात 44 जवान हुतात्मा झाले. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दारच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या कृत्याची आम्हाला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया दिली.
याबाबत आदिल दारचा नातेवाईक अब्दुल रशिद म्हणाला, की ''आदिलने लहानपणीच शिक्षण सोडले होते. तो मोलमजुरी करत होता. तो मागील वर्षी त्याचा भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो, असे सांगितले होते. त्यानंतर आदिल बेपत्ता झाला. त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांत माहिती दिली होती. त्याच्या कुटुंबियांनी त्याला दहशतवादाचा मार्ग सोडून परत येण्याचे सांगितले होते. मात्र, तो माघारी परतला नाही''.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यानंतर आता आदिलच्या कुटुंबियांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.