Pulwama Attack :काँग्रेसचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्याच्या सात दिवसांनंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशातील 40 जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कॉर्बेट पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. जगात असा कुठला पंतप्रधान असेल का?, असा प्रश्नही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

पुलवामा हल्ला 3 वाजून 10 मिनिटांनी झाला आणि मोदी संध्याकाळी 6.10 वाजता शूटिंगमध्ये बिझी होते. तर दुसरीकडे देश छिन्नविछिन्न शहिदांच्या मृतदेहांकडे पाहत होता. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चुली बंद होत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधल्या रामनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-नाश्ता करत होते. जगातल्या कोणत्याही देशाला क्वचितच असा पंतप्रधान लाभला असावा. भारताचे पंतप्रधान पुलवामा हल्ल्याच्या चार तासांनंतरही वनविहार करण्यात व्यस्त होते. जवानांवर हल्ला झाला, त्यानंतरही त्यांचं तीन तास शूटिंग सुरू होते. पुलवामा हल्ल्यानंतरही मोदींच्या सभा थांबल्या नाहीत.


देश शोकसागरात बुडाला असतानाच मोदी देश-विदेशाचे दौरे करत सुटले आहेत. पालम एअरपोर्टवरही शहिदांचे पार्थिव मोदींची वाट पाहत राहिले, तिथेही मोदी उशिरानं पोहोचले. काँग्रेसनं पुलवामा हल्ल्यात निर्णायक कारवाईची मागणी केली आहे.


इंदिरा गांधींनी फक्त बांगलादेशला स्वतंत्र केलं नव्हतं, तर पाकिस्तानच्या 91 हजार सैनिकांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं होतं. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धूळ चारली होती. सुरजेवाला म्हणाले, आम्ही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. परंतु मोदींची राजधर्म विसरले आहेत. सत्तेच्या भुकेत मोदींमधली माणुसकी हरवली आहे.

Review