गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त;श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या १४१ व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पहाटे श्रींना अभिषेक व सहस्त्रावर्तन करण्यात आला. दुपारी १२ वाजता हरिनामाचा गजर करुन श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी हजारों भक्त भाविकांनी दर्शन घेतले. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

श्री गजानन महाराज हरिपाठ भजनी मंडळ, सप्तसुर मंडळ यांनी भजन, गायन व सतारवादन आणि बाळासाहेब पंढरपूर यांनी मंत्र जागर केला. सायंकाळी झाली फुले स्वरांची या सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. तसेच मंगळवार (दि.१९ फेब्रुवारी) पासून सोमवार पर्यंत श्रींच्या गाभाऱ्यात माता तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना, अन्नपुर्णा दर्शन, बालाजी दर्शन, श्री मल्हार दर्शन, नर्मदा नदी प्रसंग आदी आकर्षक देखावे करण्यात आले होते. तसेच विविध धार्मिक व समाज प्रबोधनात्मक व्याख्याने, भजन, किर्तन सादर करण्यात आले यामध्ये हभप केशव शिवडेकर, डॉ.संजय उपाध्ये, हभप. प्रा. विलास गरवारे, हभप. अनंत महाराज शास्त्री दैठणकर यांनी किर्तन सादर केले. महोत्सवामध्ये रक्त तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर यांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच संस्था वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवित असते. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, योग वर्ग, गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत, नैसर्गिक आपत्ती काळात आर्थिक सहाय्य, विद्यार्थी सहाय्य, विद्यार्थी गुणगौरव व दत्तक योजना, बालसंस्कार वर्ग, रांगोळी, चित्रकला, हस्तकला स्पर्धा आदी उपक्रम घेण्यात आले.


कार्यक्रमांच्या आयोजनात श्री गजानन सत्संग मंडळांचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, सहकार्यवाह श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णू पूर्णये, सहखजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, संजय खलाटे, देविदास कुलथे व गजानन भक्तगण व सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.

Review