आसाम: विषारी दारूमुळे १३३ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

आसाम,(सह्याद्री बुलेटीन)-आसाममध्ये विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. आतापर्यंत आसाममध्ये विषारी दारूमुळे १३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या विषारी दारूमुळे २०० पेक्षा जास्त लोकांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. आसाममधील प्रशासनाने दारूच्या अवैध अड्ड्यांवर कारवाई केली असून हजारो लीटर दारू नष्ट करण्यात आली आहे. याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. आसाममध्ये विषारी दारूमुळे १३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश अग्रवाल यांनी दिली. फॉरेन्सिक तपासणीसाठी दारूचे काही नमूने पाठविण्यात आले आहेत. प्रशासन या तपासणीच्या अहवालाची वाट पाहत आहे.

दरम्यान, 'दारूची अवैध विक्री आणि उत्पादनाबाबत आतापर्यंत एकूण ९० तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. उत्पादन शुल्क नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या सर्व प्रकरणांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. २२ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ४,८६० लीटर दारू जप्त करण्यात आली आहे. ही दारू जप्त केल्यानंतर ती नष्ट करण्यात आली'. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी जोरहाट मेडिकल कॉलेजला भेट दिली. विषारी दारू प्रकरणी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी केली. विषारी दारूप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि याप्रकरणामुळे आजारी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जाहीर केली.

गुवाहाटीपासून ३०० किलोमीटर दूर स्थित असलेल्या गोलाघाटमधील सालमोरा चहाच्या मळ्याजवळील भागात विषारी दारूमुळे ही घटना घडली. तसेच, जोरहाट जिल्ह्यातील तीताबोर उपमंडळाच्या दोन दुर्गम गावांमध्ये अशाचप्रकारची घटना घडली. तेथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सालमोरा चहाच्या मळ्याजवळ राहणाऱ्या लोकांनी एकाच दुकानदाराकडून दारू खरेदी केली होती. ही दारू प्यायल्यानंतर काहीजणांची प्रकृती लगेच खालावली. तर काहींना रुग्णालयापर्यंत पोहोचवणे शक्य झाले नाही.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे विषारी दारूमुळे १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ही घटना सहारनपूर, रुडकी आणि कुशीनगर येथे घडली. सहारनपूरमध्ये ६४, रुडकीमध्ये २६ आणि कुशीनगर येथे ८ लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारुमुळे मृत झालेले लोक हे उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीच्या तेराव्याला होणाऱ्या विधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. तेथे हे लोक दारून प्यायले होते. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अवैध दारूविरोधात संपूर्ण प्रदेशात अभियान राबवले होते. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली.

 

Review