पुणे:मेट्रोच्या हबसाठी स्वारगेट चौकातील स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण
पुणे,(सह्याद्री बुलेटीन) - मेट्रोच्या हबसाठी स्वारगेट चौकातील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या दोन-चार दिवसांत त्यांचे नियोजित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. याठिकाणी 106 स्टॉल्स आणि 20 हातगाड्या आहेत. त्यांतील 61 हातगाड्यांचे पुनर्वसन सणस ग्राऊंड समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाबाजूला होणार आहे. तर उर्वरित 45 स्टॉलचे पुनर्वसन मित्रमंडळ चौकाजवळील पाटील प्लाझा समोर करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील स्टॉल्स हे प्रामुख्याने कपडे आणि अन्य वस्तूंचे असतील, तर पाटील प्लाझा येथे खाऊचे स्टॉल्स असतील. त्यानुसारच त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. प्रत्येकी 5 बाय 4 चौरस अशी दुकाने देण्यात आली आहेत. येत्या दोन-चार दिवसांत त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली. या आधी सारसबागेजवळ या स्टॉल्सचे पुनर्वसन केले जाणार होते. मात्र गणेशोत्सव आणि चतुर्थीच्या काळात सारसबागेतील गणपतीला होणारी गर्दी, तसेच सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथे पुनर्वसन केले जाऊ नये, अशी मागणी होती. मात्र सर्वार्थाने विचार करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
'त्या' स्टॉल्सबाबत निर्णय काय?
स्वारगेट चौकात स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली दोन स्टॉल्स आहेत, जे काढावे लागणार आहेत. परंतु काही पदाधिकाऱ्यांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे त्या स्टॉलबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.