१०वी-१२वीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका
मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)-राज्यातील 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले आहे. शिक्षकांच्या मागणीनंतर मुख्य निवडणूक कार्यालयाने याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी नियामक तसेच परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणुकीचे काम लावल्यास निकाल रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे विविध शिक्षक संघटनांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी केली होती. त्यामुळे याची दखल घेत निवडणूक आयोगाचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना. वळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 10वी आणि 12वीच्या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून वगळण्याचे आदेश दिले.