सुषमा स्वराज यांनाही त्यांच्यानावापुढे 'चौकीदार' शब्द लावावा राहुल गांधींचे ट्विट
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- भाजपच्या मै भी चौकीदार मोहिमेवर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सर्व भारतीय म्हणत आहेत चौकीदार चोर आहे, अशी टीका केली. तसेच त्यांनी कोणीतरी सुषमा स्वराज यांनाही ट्विटर हँडलला चौकीदार शब्द लावण्यास सांगावे असा सल्ला दिल्यानंतर लगेच स्वराज यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून चौकीदार सुषमा स्वराज असे करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या नावासमोर चौकीदार असा शब्द लावल्यानंतर राहुल गांधींनी भाजपला लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी राफेल करारावरून चौकीदार चोर है अशी घोषणा दिली होती. देशभरात याची चर्चा सुरु असताना भाजपने याला प्रत्युत्तर म्हणून मै भी चौकीदार ही मोहिम सुरु केली. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक नेत्याने ट्विटर हँडलचे नाव बदलून आपल्या नावापुढे चौकीदार हा शब्द लावला. याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी ट्विट करत भाजपला लक्ष्य केले आहे.
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य बदलणार नाही. आज देशातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे, चौकीदार चोर है. माझे कोणाला तरी सांगणे आहे, की त्यांनी सुषमा स्वराज यांनाही त्यांच्यानावापुढे चौकीदार शब्द लावण्यास सांगावा. ते चांगले दिसत नाही. त्यानंतर त्यांच्या हँडलचे नाव बदलण्यात आले होते.