मतदार यादीतील दुबार नावे ताबडतोब वगळावीत-अजित पवार

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)दि.16 मार्च 2019 मावळ लोकसभा मतदार संघात असणाऱ्या पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत ऐकतीस हजारांहून जास्त दुबार नावे असल्याचे पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत अजित पवार यांनी ताबडतोब पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना फोन करून कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच रविवारी चिंचवड येथे होणार्या राष्ट्रवादीच्या सभेस राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांनी उपस्थित राहावे. यासाठी अजित पवार यांनी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची शनिवारी भेट घेतली.

राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची सुरुवात रविवारी दि. 17 मार्च रोजी चिंचवडमधून होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेश व शहर पातळीवरील पदाधिकारी व मित्र पक्षांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या पूर्व तयारीसाठी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची पिंपळे निलख येथे साठे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, युवानेते नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, नगरसेवक विक्रांत लांडे, राष्ट्रवादी शहर प्रवक्ता फजल शेख, मयुर कलाटे, कॉंग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस मयुर जैसवाल, तसेच संतोष साठे, काळूशेठ नांदगुडे, नंदकिशोर रणदिवे, सुभेराज साठे, संजय साठे, शिरीष साठे, विजय जगताप, सुरेश साठे, संकेत जगताप व साठे कुटुंबिय उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांची मतदार यादी वेबसाईटवर जाहिर केली होती. या यादीबाबत साठे यांनी आक्षेप घेतला होता. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात 8 कोटी 44 लाखांहून जास्त मतदार असल्याचे वेबसाईटवर दिसते. यापैकी सुमारे 44 लाख 61 हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात अनेक नावे दुबार असल्याचे दिसते.
मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी विधानसभा व चिंचवड विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी विधानसभेचा समावेश आहे. या तीनही विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत पिंपरी - 9453, चिंचवड - 22404 आणि भोसरी - 20674 अशी एकूण 52531 मतदारांची दुबार नावे आहेत. हा तपशील साठे यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना दिलेल्या पत्रासोबत जोडला आहे. निवडणूका लोकशाही पध्दतीने होत असताना यादीत दुबार नावे असणे अतिशय गंभीर असल्याचे साठे यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

Review