लोकसभा २०१९ : प्रचारासाठी निघालेले अमोल कोल्हे शिवज्योत दिसताच रॅलीत सहभागी

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या त्यांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (ता. 23) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना मार्गावरून काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅली काढत असल्याचे दिसले. त्यांनी वेळ न दवडता या रॅलीत सहभागी होऊन स्वतः च्या हातात शिज्योत घेऊन कोल्हे हे अनवाणी पायाने धावले.

अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्टार प्रवाहवरील राजा शिवछत्रपती या मालिकेत शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर आता ते झी मराठीवरील संभाजी या मालिकेत संभाजी राजांची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज आणि अमोल कोल्हे हे एक अनोखं नातंच समजले जातं. यामुळे शिवज्योत हाती घेऊन धावण्यासाठी कोल्हे अति उत्सुक होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवतील.

Review