भोसरी: मतदारसंघात तब्बल 10 हजार दुबार मतदार;दुबार मतदारांवर होणार फौजदारी कारवाई...
भोसरी,(सह्याद्री बुलेटीन)- शिरुर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात तब्बल 10 हजार दुबार मतदार आहेत. तर, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 1698 दुबार मतदार आहेत. आचारसंहिता असल्याने दुबार मतदारांची नावे यादीतून वगळता येत नाहीत. त्यामुळे मतदारांवर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. दुबार मतदारांनी दोनदा मतदान केल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चार मतदारसंघात एक लाख 828 दुबार मतदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले तरी, ते मतदार यादीतून वगळता येत नाही. त्यामुळे दुबार मतदान होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. दुबार मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. दुबार मतदान केल्यास तो गुन्हा ठरतो. त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघात तब्बल 10 हजार दुबार मतदार आहेत. तर, शिरुरमधीलच आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 1698 दुबार मतदार आहेत. शिरुरमध्ये 5066, जुन्नरमध्ये 2139, खेड-आळंदीत 4148 आणि हडपसरमध्ये 7867 दुबार मतदार आहेत. तर, मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरीत 5437, चिंचवड 7174 आणि मावळमध्ये 5951 दुबार मतदार आहेत.