
मावळ मतदारसंघाचा खासदार;२२ लाख मतदार ठरवणार
-लोकसभा निवडणूक : अधिसूचनेसोबत अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध
-घाटाखालच्या मतदारांची संख्याही वाढली
-२०१४च्या तुलनेत 2 लाख ७३ हजार मतदार वाढले,
-महिला मतदारांची संख्या १ लाख ४३ हजारांनी वाढली
-पनवेलमध्ये सर्वाधिक तर उरणमध्ये सर्वात कमी मतदार
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) – मावळ लोकसभा मतदार संघात यंदा मोठी चुरस पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने २ एप्रिल रोजी प्रसिध्द केली. अधिसूचना प्रसिध्द केल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम मतदारयादीही प्रसिध्द केली असून एकूण २२ लाख २७ हजार ६३३ मतदार खासदार ठरवतील. क्षेत्रफळाने अतिशय मोठा असलेल्या या मतदारासंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. या लोकसभा मतदार संघात सर्वांत मोठा विधानसभा मतदार संघ हा पनवेल असून येथे ५ लाख १४ हजार ९०२ मतदार आहेत. तर सर्वांत कमी मतदार कर्जत विधानसभात मतदार संघात आहेत. कर्जतमध्ये २ लाख ७५ हजार ४८० मतदार आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघाचा नकाशा पाहिल्यास पिंपरी आणि चिंचवड हे मतदार संघ अतिशय लहान दिसून येतात परंतु येथील मतदारसंख्या मात्र अधिक आहे. पनवेलच्या खालोखाल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये ४ लाख ७६ हजार ७८० मतदार आहेत. विस्तारलेला मतदारसंघ आणि वाढलेले मतदार यामुळे प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवाराला मोठी कसरत करावी लागत आहे. या मतदार संघाची ओळख म्हणजे घाटाखालाचा आणि घाटावरचा भाग अशी होते. पुणे आणि रायगड जिल्ह्यातील तीन-तीन विधानसभा मतदार संघ या लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. दोन्ही बाजूला आता मतदार संख्या जवळपास सारखी होत असल्याने उमेदवारांना या प्रचंड मोठ्या आणि विस्तारलेल्या भागात चांगलीच धावपळ करावी लागत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने २ एप्रिल रोजी प्रसिध्द केली. अधिसूचना प्रसिध्द केल्यानंतर निवडणूक विभागाने अंतिम मतदारयादीही प्रसिध्द केली असून या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानामध्ये वाढ झाली आहे. एकूण सहा विधासभा मतदारसंघात विस्तारलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ विधासभा मतदारसंघ तर घाटाखालील पनवेल, कर्जत व उरण या सहा विधासभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीत घाटाखालील मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने उमेदवारांना विजय मिळवण्यासाठी घाटाखालील मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागणार आहे.
२ लाख ७३ हजार मतदार वाढले:
मावळ लोकसभेमध्ये २०१४ साली झालेल्या निवडणुकीत १९ लाख ५३ हजार ७३१ मतदार होते. त्यापैकी ११ लाख ७३ हजार ९४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१४ मध्ये मावळमध्ये ६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ मध्ये २०१४ च्या तुलनेत २ लाख ७३ हजार ९०२ मतदार वाढले आहेत. यामध्ये महिलांची संख्या अधिक असून १ लाख ४३ हजार ५५९ महिला मतदार वाढल्या आहेत तर पुरुषांचे १ लाख ३० हजार ३११ मतदान वाढले आहे. यावेळी ११ लाख ६६ हजार २७२ पुरुष मतदार तर महिला १० लाख ६१ हजार ३२९ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे, या निवडणुकीत महिलांचे मतदानही निर्णयक ठरणार आहे. उमेदवारांना महिलांचे मतदान आपल्याकडे वळवण्यासाठीही विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.