लोकसभा निवडणूक २०१९ पाहिला टप्पा :महाराष्ट्रातील ७ मतदारसंघातील प्रचार संपला; गुरुवार,११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान
उद्या मतदान ; निवडणूक यंत्रणा सज्ज
मुुंबई,(सह्याद्री बुलेटीन)– देशात नव्याने अस्तित्वात येणाछया १७ व्या लोकसभेसाठी गुरुवार, ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणूकीसाठी ४८ तासांपूर्वी म्हणजे आज सायंकाळी ६ च्या सुमारास प्रचार संपला. महाराष्ट्रात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार मैदानात उतरले आहेत. सुमारे १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार या मतदारसंघातील ७ उमेदवारांचे भवितव्य घडविणार आहेत. मतदानासाठी या मतदारसंघातील एकूण १४ हजार ९१९ मतदान केंद्रे सज्ज झाली असून त्यासाठी ७३ हजार ८३७ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला विदर्भातून सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी दिग्गजांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. मोदींनी वर्धा, चंद्रपूर तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लातूरमधील औसा येथे युतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतली.
७ मतदारसंघात एकूण ११६ उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. सात मतदार संघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत तर १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत. त्यामध्ये ६६ लाख ७१ हजार पुरुष तर ६३ लाख ६४ हजार महिला आणि १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी करण्यात आली आहे. ज्या मतदार संघात १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत अशा मतदान केंद्रांवर २ बॅलेट युनिट बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी २६ हजार बॅलेट युनिट आणि १८ हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून २० हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.