पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी का घाबरतात, राज ठाकरे यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी प्रचार संपताना झालेल्या पत्रकार परिषदेला आलेच कशाला? पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी एवढं का घाबरतात? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतके दिवस दादागिरी केली, ती दादागिरीच त्यांना भोगावी लागणार आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
शुक्रवारी भाजपाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. मात्र पंतप्रधानांनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. याच मुद्द्यावरून विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत.
शनिवारी सकाळीही मोदींची पत्रकार परिषद म्हणजे मन की बात नाही तर मौन की बात होती, असं ट्विटही राज ठाकरेंनी केलं होतं.