तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या, पक्षीय राजकारणाला हिंसक रंग...
पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अजीजूर रहमान असं हत्या झालेल्या कार्यकर्त्याचं नाव असून कुचबिहारमधील पेटला बाजारा परिसरात बुधवारी (5 जून) रोजी हि हत्या करण्यात आली आहे. भाजपाने ही हत्या केल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेल्या तीन दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. अजीजूर रहमान यांच्या नातेवाईकांनी तसेच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या भाजपाने केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी अजीजूर यांच्या घरात घूसून त्यांना बेदम मारहाण करून हत्या केल्याचं म्हटलं आहे. तर भाजपाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.